वर्ष दोन वर्षापासून भारतीय शेअर बाजारांनी असमाधानकारक परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदारांना आता नेमके कुठे पैसे गुंतवू ? असा प्रश्न पडायला लागला आणि त्यावेळी मदतीला धावून आले ते भारत सोडून अन्य देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करायची संधी देणारे म्युच्युअल फंड.
भारतीयांसाठी ग्लोबल गुंतवणुकीची संधी
रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमानुसार जसे भारतातील कंपन्यांचे शेअर्स डिमॅट अकाउंट वरून विकत घेता येतात तसे परदेशी कंपन्यांचे शेअर्स विशेषतः एक्सचेंज ट्रेडेड फंड विकत घेता येतात.
भारतातील म्युच्युअल फंडाद्वारे परदेशातील गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध करून दिले जातात. यातील पहिल्या पर्यायात तुम्ही भारतीय फंड घराण्याच्या योजनेत पैसे गुंतवता आणि त्यांचे फंड मॅनेजर्स तुमचे पैसे थेट परदेशातील शेअर्स मध्ये गुंतवतात. दुसऱ्या पर्यायात आपल्याला गुंतवणुकीची संधी पॅसिव्ह पद्धतीने मिळते म्हणजेच तुम्ही भारतातील एका म्युच्युअल फंडात गुंतवता आणि त्या फंडातील पैसे परदेशातील एखाद्या फंड योजनेत गुंतवले जातात म्हणजेच ती फंड ऑफ फंड या प्रकारची योजना असते.
हा गुंतवणूक पर्याय अजिबातच नवीन नाही हे लक्षात घ्यायला हवे. उभरत्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्यात ज्यांचा हातखंडा होता असे फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाचे एकेकाळचे व्यवस्थापक मार्क मोबीएस (यांचे अलीकडेच निधन झाले) यांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी ‘टेम्पलटन इंडिया इक्विटी इन्कम फंड’ या नावाने योजना आणली होती. म्हणजेच ते निधी व्यवस्थापक होते. या फंड योजनेतील ठराविक गुंतवणूक ब्राझील, चीन, दक्षिण कोरिया अशा उदयोन्मुख बाजारपेठा (इमर्जिंग मार्केट) यामध्ये केली जात असे. याच फ्रँकलिन फंड घराण्याकडून फ्रँकलिन एशियन इक्विटी फंड ही योजना आणली गेली होती. नावाप्रमाणेच भारतीय नव्हे तर आशियाई बाजारपेठांमध्ये थेट गुंतवणुकीची संधी या योजनेत मिळत असे. या योजना त्याकाळी फारशा लोकप्रिय झाल्या नाहीत कारण एकूणच म्युच्युअल फंड आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याबद्दलच साक्षरता कमी होती व खूप कमी लोक नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत. गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीची गंगाजळी विस्फोट झाल्यासारखी वाढली आहे आणि परिणामी परतावा अधिकाधिक मिळावा याची जणू काही चटक लागल्यासारखे गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात झाली.

पराग पारिख फ्लेक्सिकॅपचे गारुड
गुंतवणुकीतील मूल्यांकनावर विश्वास ठेवणारे आणि स्वतःची ठोस अशी गुंतवणुकीची शैली असणारे पराग पारिख आपल्या व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीसाठी ओळखले जात. त्यांच्याच नावाने सुरू झालेल्या फंड घराण्याने आणलेल्या योजनेत जवळपास २५ % गुंतवणूक परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरू केली. यात म्हणायला गेले तर विशेष काहीही नव्हते ! पण शेअर मार्केटचा एक अलिखित नियम आहे, ‘तुम्ही योग्य वेळी योग्य शेअरची खरेदी केली तर तुम्ही आपोआपच अर्ध युद्ध जिंकता !’
टेक कंपन्यांचे भविष्यातील चित्र काय असणार आहे याचा अंदाज पराग पारिख फ्लेक्सिकॅप फंडाच्या फंड मॅनेजर ना नक्की आला होता. त्यांनी परदेशी गुंतवणूक बहुतांशपणे अमेरिकेतील टेक्नॉलॉजी कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवली. भारतात बसून गुंतवणूकदारांना थेट गुगल, मायक्रोसॉफ्ट, एन व्हिडिआ, ॲपल यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स फंडाद्वारे विकत घेतल्याचे फायदे दिसू लागले. गेल्या दहा वर्षांपासून ही वाढ अक्षरशः दरवर्षी कायम आहे याचा थेट फायदा या फंड योजनेला झाला. मात्र गेल्या दोन वर्षाचा विचार केल्यास ही योजना गुंतवणूकदारांना आता अचानकच आवडेनाशी झालेली आहे ! हा फंड पूर्वीसारखा रिटर्न देत नाही अशी तक्रार गुंतवणूकदार करतात ! हे आंधळेपणाने गुंतवणूक करण्याचे निर्देशक आहे. पराग पारिख फ्लेक्सिकॅप फंडाचा विचार केल्यास हे स्पष्टपणे दिसते की गेल्या तीन-चार वर्षांपासून फंडाने आपले मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण कमी करत लार्ज कॅप मध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. पण गेल्या वर्षभरापासून दुर्दैवाने मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक ब्लूचिप कंपन्यांपेक्षा जास्त परतावे देत आहेत म्हणून हा फंड नावडतीचा झाला आहे. आता जेव्हा भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी गुंतवणूकदार परत एंट्री घेतील तेव्हा हाच फंड गुंतवणूकदारांना हवाहवासा वाटायला लागेल ! नवख्या गुंतवणूकदारांची अशी स्थिती होते, मुरलेले गुंतवणूकदार मात्र अशा एक-दोन वर्षातल्या फंडाच्या कमी जास्त परताव्यांवर अविश्वास दाखवत नाहीत.
कोणते बाजार आकर्षक आहेत ?
निपॉन इंडिया तैवान इक्विटी फंड हा गेल्या एक वर्षातील सर्वाधिक परतावा दिलेला इंटरनॅशनल फंड आहे. करोना पश्चात एकूणच सेमीकंडक्टर आणि ए आय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या संदर्भातील व्यवसायांमध्ये ज्या कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले. अर्थातच यात तैवानचा मोठा वाटा आहे. मग आता आपणही या पंडात लगेच गुंतवणूक सुरू करू शकतो का ? याचे उत्तर ज्या देशात गुंतवणूक करत आहात त्या देशाच्या मॅक्रो स्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तैवान, चीन आणि दक्षिण कोरिया यांच्या जीडीपी वाढीचा दर सतत कायम आहे व पुरवठा साखळीतील यांचे स्थान आजही अबाधित आहे. त्यातूनच भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचे प्रमाण घटले आहे. अक्षरशः गेल्या दोन वर्षात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक विकून परदेशी गुंतवणूकदारांनी हेच पैसे अन्य बाजारपेठांमध्ये वळवले आहेत. बहुतांश प्रगती पुस्तकात हिट ठरलेले आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड आता गुंतवणुकीसाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत कारण त्यावर भारतीय नियमकांचे काही निर्बंध आहेत.
पुढील तक्त्यामध्ये निवडक फंडांचे एक तीन पाच आणि दहा वर्षातील परतावे दिले आहेत. यातून एक स्पष्ट होते की म्युच्युअल फंड योजना बाजाराच्या चक्राकार गतीवर अवलंबून असतात.
Returns as on 30th May 2026
| फंड योजना | एक वर्ष | तीन वर्षे | पाच वर्षे | दहा वर्षे |
| निपॉन इंडिया तैवान इक्विटी फंड | 217 % | 63 % | — | — |
| आयसी आय सी आय प्रू यू एस ब्लूचिप फंड | २२ % | १४ % | ११ % | १४ % |
| अकसीस ग्रेटर चायना इक्विटी फंड | ६१ % | २२ % | ५ % | — |
| पराग पारिख फ्लेक्सिकॅप फंड | 0.31 % | 15.47 % | 14.85 % | 17 % |
ज्या देशात गुंतवणुकीची संधी अधिक आणि परतावा जेवढा जास्त तिकडे परदेशी गुंतवणूक आपोआपच वळते व परिणामी त्या देशातील शेअर बाजार वाढतात म्हणूनच तात्पुरत्या लोभापाई अशी गुंतवणूक करणे टाळावे. आपल्या पोर्टफोलिओतील दहा टक्के गुंतवणूक परदेशी फंडांमध्ये असायला काहीही हरकत नाही. त्यातही अमेरिकन व आशियाई बाजारातील ईटीएफची निवड अधिक संयुक्त ठरते संयुक्तिक.
मर्जर्स आणि Value unlock
एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
शेअर मार्केट ? शास्त्र असतं ते ! थ्रील नाही
एस.डब्ल्यू.पी नक्की कोणत्या वयोगटासाठी ?
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?