Skip to main content

yereyerepaisa.com

Mutual Fund

‘फॅक्ट शीट’ कशी वाचायची ?

‘फॅक्ट शीट’ म्हणजे काय ?

फॅक्ट म्हणजे तथ्य ! तुमच्या गुंतवणुकीचे सर्व तपशील तुम्हाला ज्या पत्रकातून मिळतात ती फॅक्ट शीट.

प्रत्येक म्युच्यअल  फंड कंपनीच्या वेबसाईटवर ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेली असते. जर तुम्ही फंडाच्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला ती वाचायला सुद्धा मिळवता येते. 

फॅक्ट शीट मध्ये नेमके काय समजते ?

आपण जे पैसे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतो ते कुठे गुंतवायचे ? याचा निर्णय फंड मॅनेजर  आणि त्याची टीम घेत असते. फॅक्ट शीट मध्ये तुमच्या फंड मॅनेजरचे नाव आणि तो किती वर्षांपासून फंड मॅनेज करत आहेत आणि त्याचा एकूण या क्षेत्रातला अनुभव किती आहे हे स्पष्टपणे लिहिलेले असते. त्यानंतर त्या फंडात किती रुपये गुंतवणूक केली गेली आहे (Assets Under Management) याची आकडेवारी असते.

फंडाने गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे कोणत्या शेअर्समध्ये / सिक्युरिटीज मध्ये गुंतवले आहेत ? याची तपशीलवार यादी तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते.

यात दोन प्रकारे माहितीचा अभ्यास करता येतो. 

टॉप टेन होल्डिंग पोर्टफोलिओ मध्ये एकूण किती शेअर्सचा समावेश केला गेला आहे ? काही फंड मॅनेजर आपल्या पोर्टफोलिओत गरजेनुसार शेअर्सची संख्या कमी जास्त करतात. हा त्या फंड मॅनेजरचा आणि फंड घराण्याचा निर्णय असतो. म्हणजे एखाद्या फंड योजनेत ३५ शेअर्स असू शकतात तर त्याच प्रकारच्या दुसऱ्या फंडात ७०-८० शेअर सुद्धा असू शकतात !

सेक्टर ॲलोकेशन

तुमच्या फंडाने कोणत्या सेक्टरमध्ये किती  गुंतवणूक केली आहे ? याचा स्पष्ट उल्लेख तक्त्याच्या किंवा आकृतीच्या साहाय्याने केला असतो. वाहन निर्मिती, रसायने, भांडवली वस्तू, संरक्षण, एफ.एम.सी.जी. बँका, वित्तीय संस्था, सेवाक्षेत्र या किंवा आणखी  कोणत्या क्षेत्रात किती टक्के पोर्टफोलिओ मधील गुंतवणूक आहे यावरून फंडाचा कल आपल्याला स्पष्ट होतो. 

जर फंड फ्लेक्झिकॅप किंवा मल्टी कॅप किंवा मल्टी असेट लोकेशन या प्रकारचा असेल तर गुंतवणुकीपैकी किती टक्के शेअर्स लार्ज कॅप, मिडकॅप किंवा स्मॉल कॅप प्रकारात आहेत ? याचे गणित आपल्याला कळते. फंडाच्या उद्देशानुसार जर फंड मॅनेजरने शेअर्स मध्ये असलेली गुंतवणूक कमी करून डेट गुंतवणूक वाढवली असेल किंवा सोन्यामधील गुंतवणूक वाढवली असेल तर त्याचाही अंदाज आपल्याला येतो. 

काही वेळा फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये महत्त्वाचे बदल घडून येतात त्यावेळी तशी माहिती सुद्धा दिली जाते. म्हणजेच फंडाने गेल्या दोन-तीन महिन्यात कुठले शेअर्स पूर्णपणे विकून पोर्टफोलिओ नवीन शेअर्स घेतले आहेत का याचीही माहिती मिळते. काही फंड कंपन्या आपल्या फॅक्ट शीट मध्ये शेअर्समधील मागील महिन्यातील गुंतवणूक किती टक्के होती हे कंसात देतात. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक तीन टक्के (२.४ %) याचा अर्थ मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात पोर्टफोलिओत एचडीएफसी बँक या शेअरचा हिस्सा वाढला आहे.

आजकाल बहुतांश कंपन्यांचे युट्युब अकाउंट सुद्धा आहेत. त्यावरून गुंतवणूकदारांसाठी फंड विषयक माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा प्रसारित केले जातात. 

फंडातील जोखीम Risk Factors

याव्यतिरिक्त फंड विषयक आणखी महत्त्वाची माहिती आपल्याला फॅक्टशीटमध्ये बघायला मिळते ती म्हणजे जोखीम आणि फंडाच्या स्थिरतेबाबतचे रेशो. अल्फा, बीटा आणि शार्प या तीन आकडेवारीवरून फंड किती स्थिर आहे याचा अंदाज येतो, अर्थात हा थोडा सखोल अभ्यास झाला.

दर महिन्याला म्युच्युअल फंड कंपन्यांकडून शेअर बाजाराचा महिन्याचा आढावा घेणारे माहितीपत्रक (न्यूज लेटर) प्रसारित केले जाते. 

आपल्याला पोर्टफोलिओ विषयक शंका आहे आणि त्यासंबंधी सहज माहिती उपलब्ध नाही हे दिवस आता संपले आहेत !

गरज आहे ती तुम्ही दोन पावले पुढे जाऊन अभ्यास करण्याची. 

लेखात वापरलेल्या फंडांची नावे उदाहरण म्हणून दिलेली आहेत. गुंतवणूक करताना जोखीम समजून घेऊन आपल्या सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक निर्णय घ्या.