Skip to main content

yereyerepaisa.com

Mutual Fund

पोर्टफोलिओ आहे ? का अनलिमिटेड थाळी !

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या बहुतेक गुंतवणूकदारांचा कोणता फंड विकत घ्यावा ? याचा अभ्यास करण्यात बराच वेळ खर्ची पडतो. त्याचबरोबर फंडाचा track record वगैरे वगैरे बघून लोक फंडात गुंतवणूक करतात ! 

पण जेवढा वेळ याला दिला जातो तितकाच वेळ आपला पोर्टफोलिओ योग्य पद्धतीने ‘बांधला’ गेला आहे का ? याचा विचार करण्यासाठी गुंतवणूकदार देत नाही. 

ऑनलाईन गुंतवणूक वाढल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी ‘थेट’ म्हणजेच कोणत्याही विक्रेत्याच्या मदतीशिवाय म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. यामध्ये सोशल मीडियावरील व्हिडिओ बघून गुंतवणूक करणाऱ्यांची ही संख्या मोठी आहे. यातील बऱ्याच गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजना ‘आवडली’ किंवा त्यामध्ये कोणीतरी पैसे गुंतवले आहेत आणि त्याला फायदा झाला म्हणून आपणही यात पैसे गुंतवावे ! अशा पद्धतीने निर्णय घेतलेले दिसतात पण हे फारसे योग्य नाही. 

तुमचा एजंट / सल्लागार तुमच्या फायद्याचे फंड देतो आहे का ?

गुंतवणूक ब्रोकरच्या माध्यमातून झाली असेल तर तुम्हाला जे फंड दिले जात आहे त्यापेक्षा तुम्हाला किती फंड दिले जात आहेत ? याचा आवर्जून विचार करा. 

बऱ्याचदा म्युच्युअल फंड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमार्फत आकर्षक प्रेझेंटेशन वगैरे करून गुंतवणूक करायला सांगितले जाते आणि लोक तसे करतातही पण याला काही अर्थ नाही. 

पोर्टफोलिओत किती फंड असावेत  ?

म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ आणि त्यात किती फंड योजना असाव्यात हे तीन गोष्टींवरून ठरते. 

  1. तुम्ही किती पैसे गुंतवणार आहात ?
  2. तुम्हाला किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे ? 
  3. तुम्ही याआधी कोणत्या फंड योजनांमध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे ? 

या प्रश्नांची उत्तरे मिळाली की साधारणपणे पाच ते दहा फंड योजना (हा आकडा सुद्धा जास्तच आहे) तुमच्या पोर्टफोलिओ साठी सुचवल्या जातात.

लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, इंडेक्स फंड आणि अग्रेसिव्ह हायब्रीड फंड या प्रकारातले एक किंवा दोन फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. 

ज्यांना हाताशी वेळ आहे त्यांना तर दोन किंवा तीन फंड योजना निश्चितपणे ठरवून त्यात दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान च्या माध्यमातून १५ ते २० वर्षे गुंतवणूक करून घसघशीत परतावा मिळतो हे आजवर सिद्ध झाले आहे. 

फंडाचा पोर्टफोलिओ म्हणजे अनलिमिटेड थाळी नव्हे !

पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने आपण हॉटेलमध्ये जेवत नाही. आपल्याला जे आवडतं आणि जी आपली गरज आहे त्यानुसार आपण जेवण पसंत करतो. ज्याप्रमाणे एखाद्या थाळीत ४५ प्रकार आहेत म्हणजे ती उत्तमच आहे असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये ३०-४० फंड असतील तर तो चुकीचा / अज्ञानातून घेतलेला / चुकीच्या मार्गदर्शनामुळे घेतलेला निर्णय आहे असे बिनधास्तपणे समजावे. 

जेवढे अधिक फंड तेवढे मोठे आव्हान

प्रमाणापेक्षा जास्त फंड योजना तुमच्या पोर्टफोलिओत असतील तर तुम्हाला त्याचा आढावा घेणे शक्य होत नाही. आदर्श गुंतवणूकदार वर्षातून एकदा आपल्या सर्व योजना योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही याचा अंदाज घेतो. आपले दैनंदिन काम सांभाळून एका वेळेला ३५ म्युच्युअल फंड योजना आपण कशा काय अभ्यासू शकतो ? हा  सोपा विचार करा !

ज्यांनी नवीन फंड योजना (NFO) आली म्हणून काहीही विचार न करता त्यात पैसे गुंतवले होते त्यांना कदाचित फायदा झाला असेल, कारण गेल्या दहा वर्षात शेअर बाजार सतत वरचढ राहिले आहे, पण हा ‘गुंतवणूक बेशिस्तीचा’ प्रकार आहे.