भारतातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या मागच्या दहा वर्षातील रणनीतीचा अभ्यास केल्यास एक समान दुवा आढळून येतो तो म्हणजे दोन कंपन्या एकत्र येऊन महाकाय कंपनी तयार करणे किंवा आपल्याच कंपनीतील वेगळा व्यवसाय करणारी उप- कंपनी वेगळी काढून शेअर बाजारात उतरवणे. गुंतवणूकदारांसाठी अशा प्रकारच्या व्यवहारांचा गृहपाठ म्हणून विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना फक्त कंपन्यांचा नफा तोटा किंवा दरवर्षी दिला जाणारा लाभांश यांचाच विचार न करता व्यवस्थापनाचे पुढील पाच ते दहा वर्षात कंपनी पुढे नेण्याचे कसे धोरण आहे किंवा नेमकी काय रणनीती आखली जाणार आहे याचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
एखाद्या कंपनीतून उप-कंपनी वेगळी काढणे आणि त्याचे शेअर बाजारात लिस्टिंग (सूचीबद्ध) करणे हे एका रात्रीत होणारे काम नसते. त्याचप्रमाणे दोन महाकाय कंपन्या एकत्र येऊन मेगा कंपनी सुरू करणे हेही तितकेच कठीण आणि वेळकाढू काम आहे म्हणूनच कंपन्यांना याचा विचार तीन ते पाच वर्ष करावा लागतो.
कंपन्या दरवर्षी पाठवत असलेल्या वार्षिक अहवालातील मॅनेजमेंट डिस्कशन अंड अनालिसिस गुंतवणूकदारांनी आवर्जून वाचली पाहिजेत.
आजच्या लेखात अशाच काही कंपन्यांच्या रणनीतीची माहिती करून घेऊया.
टाटा मोटर्स
टाटा मोटर्स या वाहन उद्योगातील कंपनीने २००८ मध्ये २.३ बिलियन डॉलर्स रोख मोजून जग्वार आणि लँड रोवर हे ब्रँड विकत घेतले. त्याच कंपनीने गेल्या वर्षी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल हे दोन व्यवसाय वेगळे करून कंपनीचे पुनर्गठन केले. पॅसेंजर व्हेईकल या कंपनीकडे गाड्या, इलेक्ट्रिक मोटारी आणि जग्वार लँड रोवर हे ब्रँड ठेवले तर पॅसेंजर व्हेईकल या कंपनीकडे ट्रक बस आणि व्यावसायिक वापराची वाहने असे उद्योग दिले. टाटा मोटर्सचे शेअर्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना या कंपन्यांचे शेअर्स मिळाले.
आयटीसी आणि आयटीसी हॉटेल
भारतातील एफ.एम.सी.जी. क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयटीसी ने मागच्या वर्षी आयटीसी हॉटेल ही कंपनी वेगळी काढून शेअर बाजारात उतरवली. ‘आयटीसी’च्या दहा शेअर्स मागे आयटीसी हॉटेलचा एक शेअर गुंतवणूकदारांना मिळाला. एफ.एम.सी.जी. क्षेत्रात भारताची पहिल्या क्रमांकाची कंपनी बनवण्याचा ध्यास घेतलेल्या आयटीसी चा शेअर गेल्या वर्षभरात मात्र गुंतवणूकदारांना फारसे काहीही देऊ शकलेला नाही. ५२ आठवड्यातील नीचांकी स्तरावर सध्या आयटीसी चा शेअर मिळतो आहे.

‘एचडीएफसी’चे महाविलीनीकरण
जवळपास दहा वर्षापासून चर्चा आणि नियोजनाच्या पातळीवर असलेल्या एच.डी.एफ.सी. बँक आणि एच.डी.एफ.सी. या दोन महाकाय कंपन्यांचे तीन वर्षांपूर्वी विलीनीकरण झाले आणि जवळपास पंधरा लाख कोटी बाजारमूल्य असलेली महाकाय कंपनी उदयाला आली. एच.डी.एफ.सी. बँकेला एच.डी.एफ.सी. चा तयार ग्राहक वर्ग मिळाला मात्र गेल्या तीन वर्षात शेअर होल्डर्स च्या हाती नेमके काय लागले आहे ? हा संशोधनाचाच विषय आहे.

वेदांता आणि कर्ज व्यवस्थापन
संसाधनांच्या क्षेत्रात असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीने जून महिन्यात आपला बिजनेस एका मोठ्या प्रक्रियेनंतर चार प्रकारात विभागला. ऊर्जा निर्मिती, तेल आणि वायू, लोह पोलाद आणि ॲल्युमिनियम या चार कंपन्या वेगळ्या केल्या. वेदांतावर असलेले महाग कर्ज यानिमित्ताने हाताळणे या कंपन्यांना सोपे जाईल असा अंदाज आहे. सेसा गोवा पासून सुरू झालेला वेदांताचा प्रवास शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱ्याला उत्तम केस स्टडीज आहे. ॲल्युमिनियम आणि तांबे या क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या वेदांताने गुंतवणूकदारांना नेमके काय दिले आहे ते समजायला आणखी दोन वर्षे लागतील.

लार्सन अँड टुब्रो
भारतातील अभियांत्रिकी हे प्रमुख क्षेत्र आणि त्याचबरोबर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लार्सन अँड टुब्रो या कंपनीने अनिल नाईक प्रमुखपदी असताना व्यवसाय विभाजनाचा निर्णय घेतला. कंपनीतील इंजीनियरिंग, कन्स्ट्रक्शन, फायनान्स, टेक्नॉलॉजी, डिफेन्स असे व्यवसाय हळूहळू वेगळे काढून ते बाजारामध्ये सूचीबद्ध करण्यात येतील असा दीर्घकालीन आराखडा मांडला गेला. यापैकी फायनान्स ,टेक्नॉलॉजी या कंपन्या वेगळ्या होऊन त्या उत्तम पद्धतीने व्यवसाय करत आहेत.
एकच महाकाय कंपनी असण्यापेक्षा आपापल्या व्यवसायात ‘फोकस’ असलेली कंपनी चालवणे सोपे असते असा विचार पुढे येऊ लागला आहे. गरज पडली तर एकाच समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्या एकमेकांमध्ये गुंतवणूक करून त्यांना मदत करू शकतात.
भारतात २०२५ या एका वर्षात ४० बिलियन डॉलर्स एवढ्या मूल्याचे व्यवहार कंपन्या एकत्र येणे किंवा वेगळ्या होणे या संदर्भात घडलेले आहेत.
मर्जर्स आणि Value unlock
एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
शेअर मार्केट ? शास्त्र असतं ते ! थ्रील नाही
एस.डब्ल्यू.पी नक्की कोणत्या वयोगटासाठी ?
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?