भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, एकूणच शेअर बाजार वगळता गुंतवणुकीचे कुठलेच पर्याय उपलब्ध नाहीत असेच बहुसंख्य लोकांना वाटू लागले आहे अशा तऱ्हेचे चित्र दिसायला सुरुवात झाली.
शेअर बाजार हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशा प्रकारचे स्वरूप नाही हे समजून घेण्यात नव गुंतवणूकदार कुठेतरी अपयशी ठरत आहेत हे नक्कीच.
ऑनलाइन शेअर विक्रीचे पर्याय उपलब्ध झाल्याने आणि त्यातून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया मुळे शेअर बद्दल माहिती घेणे लीलया शक्य झाले.
‘पोर्टफोलिओ बांधणे’ ही एक कला आहे तितकेच ते शास्त्रही आहे
‘फार विचार करू नका, मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करायचा विचार करा’ अशी आकर्षक वाक्य वाचल्यानेच जणू काही शेअर बाजारातून पैसा मिळेल की काय असे लोकांना वाटू लागले नाही तरच नवल. त्यातून गेल्या वर्ष दीड वर्षात आलेले आयपीओचे पीकही याला कारणीभूत आहे. एखाद्याने पत्ते पिसावे आणि सगळेच हुकमाचे एक्के आपल्याला मिळावेत किंवा दोन फाशांमध्ये सलग आपल्यालाच सहा आणि सहा पडावेत एवढ्या सहज आयपीओतून पैसे मिळतात असे लोकांना वाटू लागले आहे.
प्रत्येक कंपनी आयपीओमधील जोखमीचे (Risk Factors) तपशीलवार वर्णन करणारी एक पुस्तिका छापत असते. त्याचबरोबर आयपीओ बाजारात येताना वर्तमानपत्रात ज्या जाहिराती केल्या जातात त्यामध्ये ठळक अक्षरात कंपनीच्या व्यवसायाबद्दलची जोखीमही स्पष्टपणे लिहिलेली दिसते. याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बाजार तेजीत आहेत ‘घ्या आयपीओ मध्ये उडी’ अशा प्रकारे नव गुंतवणूकदारच नव्हे तर जुन्या जाणत्यांचीही बदलती भूमिका दिसायला लागली आहे.

आयपीओमध्ये लागलेले शेअर्स नेमके कधी विकायचे ?
हे ज्याला कळत नाही याचाच अर्थ त्याला आयपीओ मध्ये पैसे का ठेवायचे होते तेच कळलेले नाही ! आयपीओ मधून आपल्याला शेअर मिळाले तर
पहिल्याच दिवशी ते किती टक्के वर गेल्यावर मी ते विकणार आहे ?
किंवा मी किती वर्षे तो शेअर माझ्या पोर्टफोलिओचा भाग म्हणूनच ठेवणार आहे ?
किंवा ठराविक टक्के किमतीत वाढ झाली तर मी तो शेअर विकणार आहे ?
याचा विचार गुंतवणूकदार करतात का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
‘तुम्ही आयपीओ मध्ये पैसे का गुंतवले ?’
या प्रश्नाची जी विनोदी उत्तरे मला मिळाली त्यामधील तीन उत्तरे मला चिंता वाढवणारी वाटतात.
१) कधीच आयपीओत पैसे टाकायचा विचार केला नव्हता म्हटलं या वेळेला प्रयत्न करू
२) आयपीओ चांगला लिस्ट झाला तर फायदा नाहीतर लॉस बुक करू
३) आयपीओ मध्ये शेअर मिळाले की पहिल्या दिवशीचा भाव पाहून ठरवता येईल की विकायचे का नाही.
या तिन्ही प्रतिक्रिया एखादी जत्रेतील वेगळ्या आकाश पाळण्याची चक्कर मारून बघूया तसाच एक अनुभव घेऊन बघूया अशी भूमिका वाटते !
शेअर बाजारातील चढउतारांचा कोणताही अभ्यास न करता किंवा तेवढे मानसिक परिश्रम न घेता थेट वायदे बाजारातच पैसे गुंतवणूक करायची अभिलाषा बाळगणारे अधिकच धोकादायक ठरतात. सध्या बाजाराची अवस्था मागच्या दहा वर्षात जशी राहिली आहे तशीच कायमस्वरूपी राहणार आहे व त्यात कधीच चढउतार येणार नाहीत असा प्रबळ आत्मविश्वास असलेले गुंतवणूकदार तुम्हाला सकारात्मक विचार देऊन जातात पण ते वास्तव मान्य करायला तयार असतातच असे नाही. त्यातही उधार घेतलेल्या पैशांनी ट्रेडिंग करणाऱ्यांविषयी बोलणेच अवघड !
कारण शेअर बाजार म्हणजे थ्रील नाही शास्त्र असतं ते !
एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
एसआयपी सुरू कशी करायची ?
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
शेअर मार्केट ? शास्त्र असतं ते ! थ्रील नाही
एस.डब्ल्यू.पी नक्की कोणत्या वयोगटासाठी ?
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?