Skip to main content

yereyerepaisa.com

Mutual Fund

रिटायर्ड झालात ? मग इक्विटी फंडात इन्व्हेस्ट करायचे का ?

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि वय यांच्यातील संबंधाचा विचार केल्यास या दोन मुद्द्यांव्यतिरिक्त आणखी एक मुद्दा समोर येतो तो म्हणजे ‘रिस्क घेण्याची क्षमता.’ 

कोणती म्युच्युअल फंड योजना माझ्यासाठी चांगली आहे ? हा विचार करण्याऐवजी माझे गुंतवणुकीचे ‘निकष’ लक्षात घेऊन मी कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनेत पैसे गुंतवायला पाहिजेत ? हा विचार तुम्ही केला पाहिजे. 

ज्येष्ठ नागरिक या वयोगटासाठी गुंतवणूक करताना चार घटक महत्त्वाचे आहेत.

  1. तुमची हेल्थ
  2. कुटुंबातील सदस्य आणि तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या
  3. तुम्हाला मिळणारे दर महिन्याचे स्थिर उत्पन्न
  4. तुम्ही याआधी केलेली गुंतवणूक. 

जर तुमच्याकडे सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) हा हक्काचा पैशाचा स्त्रोत असेल आणि त्यातून किमान तुम्हाला तुमचे स्वतःचे दर महिन्याचे खर्च भागवता येतील असे गृहीत धरल्यास जर त्यातूनही रक्कम उरत असेल तर म्युच्युअल फंड योजनांमध्ये नक्की  गुंतवणूक सुरू करता येईल.

म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि ती कोणत्या वयात सुरु करायची ?  

याचा कोणताही नियम नाही किंवा त्यासाठी कोणतीही अटही नाही. 

ज्येष्ठ नागरिकांना म्युच्युअल फंड हा ‘लॉंग टर्म वेल्थ क्रीएशन’साठी महत्त्वाचा पर्याय म्हणून आवडणार आहे. कारण आता आयुर्मान वाढल्यामुळे पैशाची गरज कायमच असणार आहे व भविष्यातील आजारपणे आणि तत्सम खर्च पाहता फक्त ‘डेट’ गुंतवणुकींवर अवलंबून राहणे चालणार नाही. 

सुरुवात करताना हायब्रीड इक्विटी आणि लार्ज कॅप इक्विटी या दोन योजनांमध्ये हळूहळू पैसे गुंतवा. जर तुमचे मासिक खर्च भागवण्यासाठी तुमच्या जुन्या गुंतवणुकी पुरेशा असतील आणि तुमचे निवृत्तीवेतन शिल्लक राहत असेल तर जास्त रिस्क नक्कीच घेता येईल. अशा स्थितीत मिडकॅप आणि लार्ज कॅप या फंड योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करा. 

रिटायर्ड होताना एखादी मोठी रक्कम मिळाली असेल तर कमी वेळात भरपूर पैसे कमावता येतील अशा लोभापाई इक्विटी फंडांमध्ये पैसे गुंतवणे चुकीचे आहे.

तुमचा हेल्थ इंश्युरंस नसेल तर तुम्हाला एक ठराविक रक्कम कमी रिस्क असलेल्या योजनांमध्ये गुंतवावी लागेल. ही रक्कम डेट फंडात गुंतवू शकता. 

इक्विटी हा पर्याय मध्यम ते दीर्घ काळासाठी अत्यावश्यक आहे. कारण ज्यावेळी महागाई वाढेल त्यावेळी त्यापेक्षा अधिक वेगाने रिटर्न देणाऱ्या इक्विटी योजना तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असायला हव्यात. 

ज्येष्ठ नागरिकांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू करताना कायम ‘रिस्कोमिटर’ बघायला विसरू नये. आपण ज्या फंड योजनेत गुंतवतो आहे त्या फंड योजनेची जोखीम पातळी आपल्या जोखीम पातळीशी जुळते आहे की नाही ? हे पडताळून घेऊन मगच गुंतवणूक विषयक निर्णय घ्यावा. 

इक्विटी फंड हे फक्त तरुणांसाठी आहेत असे नाही तर सेकंड इनिंग मध्ये तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी इक्विटी योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे.