Skip to main content

yereyerepaisa.com

Mutual Fund

‘फॅक्ट शीट’ कशी वाचायची ?

म्युच्यअल  फंडात आपण जेव्हा पैसे गुंतवतो त्यावेळी आपल्याला किती वर्षासाठी पैसे ठेवायचे आहेत व आपली जोखीम घेण्याची तयारी किती आहे याच्या अनुषंगाने गुंतवणूक नियोजन केले जाते. 

डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेणे अगदी सहज शक्य झाले आहे. तुम्ही ज्या फंडात पैसे गुंतवले आहेत ते नेमके कशाप्रकारे आणि कुठे गुंतवले जात आहेत ? याविषयी संपूर्ण माहिती प्रत्येक महिन्याच्या अखेरीस म्युच्युअल फंड कंपन्यांना आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागते. 

यालाच ‘फॅक्ट शीट’ असे म्हणतात. 

‘फॅक्ट शीट’ म्हणजे काय ?

फॅक्ट म्हणजे तथ्य ! तुमच्या गुंतवणुकीचे सर्व तपशील तुम्हाला ज्या पत्रकातून मिळतात ती फॅक्ट शीट.

प्रत्येक म्युच्यअल  फंड कंपनीच्या वेबसाईटवर ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेली असते. जर तुम्ही फंडाच्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला त्याची प्रत वाचायला सुद्धा मिळवता येते. 

फॅक्ट शीट मध्ये नेमके काय समजते ?

आपण जे पैसे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतो ते कुठे गुंतवायचे ? याचा निर्णय निधी व्यवस्थापक आणि त्याची टीम घेत असते. फॅक्ट शीट मध्ये तुमच्या निधी व्यवस्थापकाचे नाव आणि तो किती वर्षांपासून फंड मॅनेज करत आहेत आणि त्याचा एकूण या क्षेत्रातला अनुभव किती आहे हे स्पष्टपणे लिहिलेले असते. 

त्यानंतर त्या फंडात किती रुपये गुंतवणूक केली गेली आहे (Assets Under Management) याची आकडेवारी असते. 

फंडाने गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे कोणत्या शेअर्समध्ये / सिक्युरिटीज मध्ये गुंतवले आहेत ? याची तपशीलवार यादी तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते.

यात दोन प्रकारे माहितीचा अभ्यास करता येतो. 

एकूण गुंतवणुकी पैकी आघाडीच्या दहा शेअर्समध्ये किती रक्कम गुंतवली आहे ? टॉप टेन होल्डिंग पोर्टफोलिओ मध्ये एकूण किती शेअर्सचा समावेश केला गेला आहे ? काही निधी व्यवस्थापक आपल्या पोर्टफोलिओत गरजेनुसार शेअर्सची संख्या कमी जास्त करतात. हा त्या निधी व्यवस्थापकाचा आणि फंड घराण्याचा निर्णय असतो. म्हणजे एखाद्या फंड योजनेत ३५ शेअर्स असू शकतात तर त्याच प्रकारच्या दुसऱ्या फंडात ७०-८० शेअर सुद्धा असू शकतात !

यापुढे एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे तुमच्या फंडाने कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे ? याचा स्पष्ट उल्लेख तक्त्याच्या किंवा आकृतीच्या साहाय्याने केला असतो. वाहन निर्मिती, रसायने, भांडवली वस्तू, संरक्षण, एफ.एम.सी.जी. बँका, वित्तीय संस्था, सेवाक्षेत्र या किंवा आणखी  कोणत्या क्षेत्रात किती टक्के पोर्टफोलिओ मधील गुंतवणूक आहे यावरून फंडाचा कल आपल्याला स्पष्ट होतो. 

जर फंड फ्लेक्झिकॅप किंवा मल्टी कॅप किंवा मल्टी असेट लोकेशन या प्रकारचा असेल तर गुंतवणुकीपैकी किती टक्के शेअर्स लार्ज कॅप, मिडकॅप किंवा स्मॉल कॅप प्रकारात आहेत ? याचे गणित आपल्याला कळते. फंडाच्या उद्देशानुसार जर निधी व्यवस्थापकाने शेअर्स मध्ये असलेली गुंतवणूक कमी करून डेट गुंतवणूक वाढवली असेल किंवा सोन्यामधील गुंतवणूक वाढवली असेल तर त्याचाही अंदाज आपल्याला येतो. 

काही वेळा फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये महत्त्वाचे बदल घडून येतात त्यावेळी तशी माहिती सुद्धा दिली जाते. म्हणजेच फंडाने गेल्या दोन-तीन महिन्यात कुठले शेअर्स पूर्णपणे विकून पोर्टफोलिओ नवीन शेअर्स घेतले आहेत का याचीही माहिती मिळते. काही फंड कंपन्या आपल्या फॅक्ट शीट मध्ये शेअर्समधील मागील महिन्यातील गुंतवणूक किती टक्के होती हे कंसात देतात. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक तीन टक्के (२.४ %) याचा अर्थ मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात पोर्टफोलिओत एचडीएफसी बँक या शेअरचा हिस्सा वाढला आहे.

आजकाल समाज माध्यमे अधिक प्रभावी ठरत असल्यामुळे बहुतांश कंपन्यांचे युट्युब अकाउंट सुद्धा आहेत. त्यावरून गुंतवणूकदारांसाठी फंड विषयक माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा प्रसारित केले जातात. 

फंडातील जोखीम

याव्यतिरिक्त फंड विषयक आणखी महत्त्वाची माहिती आपल्याला फॅक्टशीटमध्ये बघायला मिळते ती म्हणजे जोखीम आणि फंडाच्या स्थिरतेबाबतचे रेशो. अल्फा, बीटा आणि शार्प या तीन आकडेवारीवरून फंड किती स्थिर आहे याचा अंदाज येतो, अर्थात हा थोडा सखोल अभ्यास झाला.

दर महिन्याला म्युच्युअल फंड कंपन्यांकडून शेअर बाजाराचा महिन्याचा आढावा घेणारे माहितीपत्रक (न्यूज लेटर) प्रसारित केले जाते. 

आपल्याला पोर्टफोलिओ विषयक शंका आहे आणि त्यासंबंधी सहज माहिती उपलब्ध नाही हे दिवस आता संपले आहेत !

गरज आहे ती गुंतवणूकदारांनी दोन पावले पुढे जाऊन अभ्यास करण्याची.