yereyerepaisa.com

Mutual Fund

एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !

भारतात गेल्या पाच वर्षात म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषतः २०२० या वर्षी आलेल्या कोविड संकटानंतर लोकांनी विक्रमी डिमॅट अकाउंट उघडले आणि तेवढ्याच जोरदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

तुम्ही गुंतवणूक करताय त्या सिस्टिमॅटिक प्लॅन बद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

एस आय पी करणे नेमके कसे फायद्यात ठरते ?

म्युच्युअल फंड विकत घेतो म्हणजेच आपण एका फंड योजनेचे / स्कीमचे ‘युनिट’ विकत घेत असतो. समजा एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये गुंतवणूक केली व त्या फंडाची एन.ए.व्ही. (Net Asset Value) दहा रुपये असेल तर त्याला १०००० / १०  असे १००० युनिट्स मिळतील. आता जसजसे शेअर मार्केट वाढेल तसतसे एन.ए.व्ही. वाढल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवरील रिटर्न सुद्धा वाढणार आहेत. पण शेअर मार्केट नेहमीच वाढते असे नाही ! कधी शेअर मार्केट वाढते तर कधी शेअर मार्केट पडते. अशा वेळी एस.आय.पी. कामाला येते.

ज्यावेळी मार्केट पडणार असेल त्यावेळी तुमची एस.आय.पी. सुरू असेल तर तुम्हाला त्यावेळी कमी दरामध्ये युनिट्स मिळतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपयाची महिन्याची एस.आय.पी. सुरू केली आणि जानेवारी महिन्यात एन.ए.व्ही. १०० रुपये  असेल तर त्याला शंभर युनिट्स मिळतील. पण मार्च महिन्यात शेअर बाजार खाली आल्यामुळे जर एन.ए.व्ही. ८० रुपये झाली तर आपोआपच त्याला १०००० / ८० = १२५ म्हणजेच जास्त युनिट्स मिळतील. अशा पद्धतीने दरमहा एका ठराविक तारखेला पैसे गुंतवले आणि अशी गुंतवणूक दहा पंधरा वर्षे सुरू ठेवली तर तुम्हाला चांगला टप्पा गाठता येतो.

एस.आय.पी. गुंतवणुकीचे फायदे कोणते ?

अगदी आजच्या आज एसआयपी सुरू करू शकता !

सुरुवात करायला फक्त एक रक्कम ठरवणे आवश्यक असते. तुमचे गुंतवणुकीचे बजेट कमी असेल तर अगदी दर महिन्याला पाचशे रुपये एवढ्या कमी रकमेची एस.आय.पी. सुद्धा तुम्ही करू शकता. मात्र दर महिन्याला त्याच तारखेला अकाउंट मधून पैसे डेबिट होणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा.

मार्केटचा अंदाज घेत बसू नका

एस.आय.पी. मार्फत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला शेअर बाजार वर जाईल ? का खाली ? याचा विचार करायची गरज नसते. कारण ज्यावेळी शेअर बाजार वर असतात म्हणजेच वाढत असतात त्यावेळी तुमच्या युनिट्सची किंमत वाढत असते आणि जेव्हा शेअर मार्केट पडते त्यावेळी तुम्हाला जास्त युनिट्स मिळाल्यामुळे आपोआपच तुमचा फायदा होत असतो.

तुमचे भविष्यातील लक्ष ठरवून एस.आय.पी. करा

तुम्हाला शाळेत जाणारा मुलगा असेल तर त्याच्या उच्च शिक्षणासाठी,

तुमचे नुकतेच शिक्षण पूर्ण होऊन तुम्हाला नोकरी लागली असेल आणि दहा वर्षानंतर तुम्हाला एखादी फॉरेन ट्रीप करायची असेल तर त्यासाठी,

तुम्ही पन्नाशीच्या वयाचे असाल तर तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी हाताशी पैसे जमावेत यासाठी,

असे कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एस.आय.पी. सुरू करू शकता.

एसआयपी सुरू करण्यासाठी वेळेची किंवा पैशाची नाही तर शिस्त असण्याची गरज आहे. थोडे थोडे पैसे दर महिन्याला गुंतवून तुम्ही एस.आय.पी. सुरू करू शकता.

‘थेंबे थेंबे तळे साचे’ हा शब्दप्रयोग तर आपण ऐकलाच आहे. एस.आय.पी. नेमके हेच करते.