yereyerepaisa.com

Mutual Fund

तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटी फंड हवेतच !

एक काळ असा होता की शेअर बाजार म्हणजे आमच्यासाठी नाहीच असा सर्वसामान्य मराठी माणसाचा समज होता. शेअर बाजाराचे ज्ञान देणारे कोर्सेसही नव्हते. शेअर बाजारातील आलेले अनुभव कटू असल्यामुळे पारंपारिक गुंतवणूक करण्याकडेच गुंतवणूकदारांचा जास्त ओढा असायचा. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. तुमचे उत्पन्न कितीही असू दे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये इक्विटी फंड हवेच.

काय कारण आहे  ?

गुंतवणूक आणि महागाई यांच्यातील संबंध

बचत आणि गुंतवणूक यामध्ये बऱ्याचदा गफलत केली जाते. आपण आपल्या पगारातून बाजूला काढलेले पैसे म्हणजे बचत आणि जेव्हा ते पैसे कुठेतरी गुंतवले जातात तेव्हा त्याला गुंतवणूक म्हणतात. मग आपण गुंतवणूक का करतो तर फक्त भविष्यात पैसे मिळावेत म्हणून नाही. दरवर्षी महागाई दर वाढतच असतो जर महागाईचा दर 8% असेल आणि तुमची गुंतवणूक साडेपाच आणि सहा टक्क्यांनी वाढणार असेल तर ती गुंतवणूक काय कामाची म्हणूनच इक्विटी फंड महत्वाचे आहेत.

गेल्या दहा वर्षाचा सेन्सेक्स आणि निफ्टी चा प्रवास बघता कोणत्याही पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनापेक्षा शेअर बाजाराने जास्त रिटर्न्स दिले आहेत.

ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोजकेच पैसे असतात त्यांनी थेट शेअर्स कडे जाण्यापेक्षा इक्विटी फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर असते. समजा तुमच्याकडे दोन ते तीन लाख रुपये असतील आणि तुम्हाला इन्फोसिस, लार्सन, आयटीसी, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, स्टेट बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर अशा कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे असतील तर तुम्ही खूप थोडे शेअर्स घेऊ शकता. पण तुम्ही इक्विटी फंडात तेच दोन लाख रुपये गुंतवलेत तर तुमचे पैसे अनेक शेअर्समध्ये विभागले जातात.

प्रोफेशनल मॅनेजमेंट

शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची तर कंपनीची माहिती पाहिजे. कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे ते माहिती पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट वाचता आले पाहिजे. आज कंपनीला नफा होतो आहे पण काही वर्षांनी या कंपनीची स्थिती कशी असेल यावर लक्ष ठेवता आले पाहिजे व हे सर्वसामान्य माणसाला जमेलच असे नाही. पण म्युच्युअल फंडातील इक्विटी स्कीम मध्ये पैसे गुंतवले तर प्रोफेशनल फंड मॅनेजर आणि त्याची एक्स्पर्ट  टीम आपल्यासाठी हे काम करेल. म्हणूनच तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये इक्विटी फंड असलेच पाहिजेत.