yereyerepaisa.com

Mutual Fund

एस.आय.पी. साठी फंड कसा निवडाल ?

एक वेळ अशी होती की खूपच कमी म्युच्युअल फंड कंपन्या भारतात होत्या. आता मात्र अशी स्थिती नाही. ए टू झेड अनेक कंपन्या विविध प्रकारच्या फंड योजना तुमच्यासाठी घेऊन तयार आहेत. अशा वेळी फंड कसा निवडावा हा निर्णय घेणे वाटते तितके सोपे नाही. विशेषतः सोशल मीडियावर रिल्स पाहून किंवा व्हिडिओ पाहून आपली गुंतवणूक सुरू करणे हा निर्णय कदाचित धोकादायक ठरू शकतो. म्हणून पुढील चार सूत्रांचा वापर  करून तुमची एस आय पी कोणत्या फंडात सुरू करायची हा निर्णय घ्या

तुमचे फायनान्शिअल गोल काय आहे ?

घर, गाडी, विकेंड होम, फॉरेन टूर,  रिटायरमेंट प्लॅनिंग ? यापैकी कोणतेही तुमचे लक्ष असू शकते व त्यासाठी किती रुपये लागणार आहेत हे आधी समजून घ्या, लिहून काढा म्हणजे तुम्हाला दर महिन्याला किती रुपयाची एसआयपी करायची याचा निर्णय घेता येईल.

म्युच्युअल फंड घराणे निवडा

एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, पराग पारिख, कोटक, आदित्य बिर्ला अशा अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांचा फायदा व्हावा यासाठीच बिझनेस चालू करत असते. त्यामुळे तुम्हाला माहिती असलेली किंवा तुम्हाला सुचवलेली एखादी कंपनी निवडा.

फंडाचा प्रकार निवडा

जेवढी जास्त रिस्क तेवढे जास्त रिटर्न हा सोपा फंडा म्युचुअल फंडाचा आहे. लार्ज कॅप फंड तुलनात्मक दृष्ट्या स्थिर मानले जातात. मिड आणि स्मॉल कॅप फंडात रिस्क मात्र जास्त असते. तुम्हाला दीर्घकाळासाठी पोर्टफोलिओ तयार करायचा असल्यास लार्ज, मिड आणि स्मॉल अशा तीन प्रकारच्या फंड योजनांचा विचार करा आणि फंड निवडा.

फंडाचा इतिहास आणि फंड मॅनेजरचा इतिहास

तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक करायला सज्ज झाला आहात त्या फंडाच्या किती योजना कार्यरत आहेत ? त्यांचे मागच्या तीन पाच आणि दहा वर्षात कसे रिटर्न होते ? याविषयी माहिती घ्या. ही सर्व माहिती म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असते. प्रत्येक फंड मॅनेज करण्याचे काम एक तज्ञ व्यक्ती म्हणजेच फंड मॅनेजर करत असतो. तुम्ही जो फंड निवडला आहे त्या फंड मॅनेजरने आधी कोणत्या फंडाचे किती रिटर्न्स दिले आहेत ? याचा अभ्यास करा म्हणजे तुमचे पैसे नेमक्या कुणाच्या हातात तुम्ही देत आहात हे ठरवा.

बस एवढ्या चार सूत्रांचा वापर केला की कोणत्या योजनेत पैसे गुंतवायचे याचा निर्णय तुम्हाला नक्की घेता येईल.