yereyerepaisa.com

Mutual Fund

एसआयपी सुरू कशी करायची ?

तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायच्या आधी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तो म्हणजे तुम्ही किती जोखीम म्हणजे रिस्क घेऊ इच्छिता ?

जेवढी जास्त रिस्क घेण्याची तयारी असेल त्याप्रमाणे तुम्हाला कोणता फंड निवडायचा हा निर्णय घेता येतो. सर्वसाधारणपणे मिडकॅप आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये सगळ्यात जास्त रिस्क असते.

डेट फंड कमी रिस्क असलेले असतात. तुमचा गुंतवणुकीचा कालावधी एकदा ठरला की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याचा अंदाज घेता येतो.

मग एखाद्या व्यक्तीने असे ठरवले की मला पाच ते सात वर्षाच्या उद्दिष्टाने एस.आय.पी. करायला सुरुवात करायची आहे तर पुढल्या टप्प्यात कोणत्या म्युच्युअल फंड कंपनीमधून फंड निवडायचा ? याचा निर्णय घ्यायचा असतो.

भारतात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत व त्यांच्या अक्षरशा: शेकडो स्कीम आहेत, यापैकी तुम्हाला तुमची स्कीम निवडायची असते.

जर तुम्ही म्युच्युअल फंडाचा अभ्यास केला असेल तर हा निर्णय स्वतः घ्या किंवा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक सल्लागाराचा अनुभव तुमच्या बरोबर असू दे. गुंतवणूक सल्लागार मार्केट, तुमची रिस्क आणि तुमचे बजेट यांचा अंदाज घेऊन तुम्ही कोणत्या योजनेत पैसे गुंतवायचे हे ठरवतो.

पुढच्या टप्प्यात तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरून गुंतवणूक करायची असते. सगळ्याच म्युच्युअल फंडांनी आपल्या वेबसाईटवरून अशा प्रकारे गुंतवणूक करण्याची उत्तम सोय उपलब्ध करून दिली आहे त्याचा नक्की फायदा घ्या.

जर तुम्हाला ऑनलाईन गुंतवणूक कठीण वाटत असेल तर प्रत्यक्ष फॉर्म भरून गुंतवणूक करता येते.

पुढचा टप्पा म्हणजे तुम्ही महिन्यातल्या कोणत्या दिवशी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन चा हप्ता भरणार आहात ? हे ठरवून घ्या. कारण एकदा तुम्ही तो दिवस दिला की आपोआप तुमच्या बँक खात्यातून त्या दिवशी पैसे डेबिट होतात. तुम्ही फंडाचा फॉर्म भरताना तुम्हाला बँक अकाउंट नंबर रजिस्टर करावा लागतो आणि केवायसी सुद्धा करून घ्यावी लागते.

ही एकदाच करायला लागणारी प्रक्रिया आहे त्यामुळे त्यात कंटाळा करू नका.

फॉर्म भरून झाल्यावर कंपनीच्या ऑफिसमध्ये किंवा CAMS  आणि K Fintech  यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही फॉर्म देऊ शकता. जर तुम्ही गुंतवणूक सल्लागार किंवा एजंटच्या मार्फत गुंतवणूक करणार असाल तर तोच ही सगळी प्रोसेस पार पाडणार आहे.

फॉर्म भरण्याची प्रोसेस पार पडल्यानंतर सर्वसाधारणपणे आठ ते पंधरा दिवसात तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनीकडून ई-मेल आणि एसएमएस येतो व तुमची एस.आय.पी. रजिस्टर होते.

गुंतवणूक एजंट मार्फत करताना सांगेल तिथे सही करायची सवय नको !

त्याआधी सगळ्या गोष्टी समजून घ्या. कारण तुम्ही फॉर्म भरताना करत असलेली सही केवळ एक फॉर्मॅलिटी नाही तर तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीची ती सुरुवातच आहे हे लक्षात ठेवा.

एक काळ असा होता की भारतात काही लाख म्युच्युअल फंड गुंतवणूकदार होते. आता मात्र ही संख्या वाढून काही कोटींमध्ये पोचली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक हा व्यवसाय मागच्या दहा वर्षात पाच पटीने वाढला आहे. याचाच अर्थ खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार फंडांवर विश्वास ठेवत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या सुरक्षित आणि यशस्वी भविष्यासाठी म्युच्युअल फंडातील एस.आय.पी. मार्फत गुंतवणूक करायला सुरुवात करा.

एस.आय.पी. हा लॉन्ग टर्म मध्ये पैसे साठवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेला सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आजच्या तरुण पिढीला खर्च आणि बचत यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही असा आरोप केला जातो. त्यामुळे नवीन पिढीने तर एस.आय.पी. चा नक्कीच वापर करायला हवा कारण जो सिस्टिमॅटिक आहे तोच सक्सेसफुल आहे.