yereyerepaisa.com

Mutual Fund

इक्विटी फंडांचे प्रकार कोणते ?

इक्विटी फंड म्हणजे तुम्ही – आम्ही गुंतवलेले पैसे फंड मॅनेजर आणि त्याची एक्सपर्ट टीम थेट शेअर्स मध्ये गुंतवते. हे पैसे कोणत्या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवायचे आणि कोणती योजना डोक्यात ठेवून शेअर्स मध्ये गुंतवायचे यानुसार इक्विटी फंडाचे वेगवेगळे प्रकार पडतात.

लार्ज कॅप फंड

इक्विटी फंडा पैकी या प्रकारच्या फंडात एकूण गुंतवणुकीपैकी ८० % गुंतवणूक ‘लार्ज कॅप’ म्हणजेच मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये केलेली असते. कंपनीचे बाजार मूल्य – मार्केट कॅपिटलायझेशन यानुसार आकाराने सर्वात मोठ्या १०० कंपन्यांना   लार्ज कॅप कंपन्या म्हणतात.

या शंभर कंपन्यांपैकी कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे हा निर्णय फंड मॅनेजर घेतो.

मिडकॅप फंड

मिडकॅप म्हणजे सोप्या भाषेत मध्यम आकाराच्या कंपन्या. यामध्ये मार्केट कॅपिटलायझेशन नुसार १०१  ते २५० या क्रमांकाच्या कंपन्या येतात. पहिल्या शंभर कंपन्या लार्ज कॅप असतात आणि त्यानंतर दीडशे कंपन्या मिडकॅप असतात. मिडकॅप फंडात एकूण गुंतवणुकीपैकी कमीत कमी ६५ % गुंतवणूक मिडकॅप शेअर्स मध्येच करावी लागते. या दीडशे कंपन्यांपैकी आश्वासक वाटतील अशा कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर पैसे गुंतवतो.

लार्ज अँड मिड कॅप फंड

वर उल्लेख केलेल्या दोन फंडांचे कॉम्बिनेशन म्हणजेच लार्ज अँड मिड कॅप फंड. लार्ज कॅप कंपन्या आकाराने मोठ्या आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने स्थिर समजल्या जातात. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा चांगला असतो. मिडकॅप कंपन्या मध्यम आकाराच्या असून भविष्यात लार्ज कॅप बनू शकतील अशा असतात. त्यामध्ये अर्थातच रिस्क जास्त असते. लार्ज अँड मिडकॅप या फंडामध्ये कमीत कमी ३५  % गुंतवणूक लार्ज आणि ३५ %  मिड कॅप कंपन्यांमध्ये करावी लागते.

स्मॉल कॅप फंड

नावातच दिसते आहे त्याप्रमाणे आकाराने लहान म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये २५१ नंतर येणाऱ्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. या कंपन्या व्यवसायाच्या दृष्टीने लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत अगदी छोट्या असतात. कदाचित त्यांचा बाजारातला इतिहासही फार जुना नसेल पण या कंपन्यांमध्ये अलीकडच्या काळात खूप जास्त ट्रेडिंग होऊ लागल्यामुळे या कंपन्या प्रसिद्ध झाल्या असतात.  स्मॉल कॅप फंड याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. सर्वाधिक जोखीम असलेल्या कंपन्या असल्याने या फंडातील गुंतवणूक सर्वात जास्त जोखीम असलेली ठरते.

फ्लेक्झी कॅप फंड

‘फ्लेक्झिबल’ = बदलणारे. फंड मॅनेजर सतत बाजारावर लक्ष ठेवून असतो. आता शेअर मार्केट म्हणजेच सेंसेक्स आणि निफ्टी कोणत्या पातळीवर आहेत ? पुढच्या एक ते दोन वर्षात आकाराने लहान मोठ्या कोणत्या कंपन्यांना सुगीचे दिवस येणार आहेत याचा अंदाज घेऊन फंड मॅनेजर पोर्टफोलिओ मध्ये बदल करतो. फ्लेक्झिकॅप फंड कोणत्याही एकाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाही, तर गुंतवणुकीचा निर्णय फ्लेक्झिबल म्हणजेच परिस्थितीनुसार बदलणारा असतो. जर फंड मॅनेजरला वाटले की आता लार्ज कॅप पेक्षा मिड आणि स्मॉल कॅप मध्ये चांगले रिटर्न्स मिळतील तर तो पोर्टफोलीओतील लार्ज कॅप कंपन्यांची संख्या कमी करून मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांची संख्या वाढवतो व हेच जर मिड आणि स्मॉल कॅप मध्ये मंदी असेल आणि लार्ज कॅप कंपन्या वेगाने वाढतील असे वाटले तर तो लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जास्त गुंतवणूक करतो. या फंड योजना ज्यांना मध्यम ते दीर्घ काळासाठी दहा ते पंधरा वर्षे गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी चांगल्या समजल्या जातात.

सेक्टर फंड

गुंतवणूक करताना कंपनीचा आकार लहान आहे का मोठा यापेक्षा कंपनी कोणत्या क्षेत्रातली आहे ? याचा विचार करून जेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते त्यावेळेला त्याला सेक्टर फंड असे म्हणतात. इन्फ्रास्ट्रक्चर, एफएमसीजी, टेक्नॉलॉजी, बँकिंग, फार्मा अशा क्षेत्रात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सेक्टरल फंड घेऊ शकता. उदाहरण निप्पॉन इंडिया फार्मा फंड या फंडातील गुंतवणूक अर्थातच फार्मासिटिकल कंपन्या म्हणजेच औषध आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेली असते. यामध्ये एकच धोका असतो तो म्हणजे जर त्या सेक्टर मध्ये काही अडचण आली तर सेक्टर फंड निगेटिव्ह रिटर्न सुद्धा देतात. या फंडात गुंतवणूक करण्याचा एकच फायदा असा की तुम्ही छोटे आणि सामान्य गुंतवणूकदार असाल तर एकाच सेक्टर मधल्या सगळ्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स एकदम घेऊ शकत नाही पण एका सेक्टर फंडमध्ये पैसे ठेवले तर तुमचे पैसे आपोआपच त्या सगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतले जातात.

काही वर्षांपूर्वी बाजारात आलेला आणि गाजलेला सेक्टर फंड म्हणजे एच.डी.एफ.सी. डिफेन्स फंड. या फंडाने भारतातील डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करायचा मार्ग सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खुला करून दिला.

टॅक्स सेविंग फंड

जर तुम्ही जुन्या टॅक्स पद्धतीत असाल तर तुमचे दर वर्षाला टॅक्स बचतीसाठी गुंतवणूक करायचे जे मार्ग आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे टॅक्स सेविंग फंड होय. याला ‘ई एल एस एस’ असेही म्हणतात. या प्रकारच्या फंडात गुंतवणूक केल्यावर इन्कम टॅक्स सेक्शन 80 C  नुसार तुम्हाला टॅक्स मध्ये बचतीची संधी मिळते. जर तुम्ही नवीन टॅक्स पद्धतीमध्ये असाल तर या प्रकारच्या फंडातली गुंतवणूक तुम्हाला टॅक्स वाचवण्याच्या दृष्टीने कामाला येणार नाही.

मात्र पी.पी.एफ., पोस्टातील टॅक्स वाचवायच्या योजना यांच्या तुलनेत टॅक्स सेविंग फंडात मध्यम ते दीर्घ काळात चांगले रिटर्न  मिळतात.