yereyerepaisa.com

Insurance

आपल्यासाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी योग्य हे कसे निवडाल ?

तुमचे वय किती ?

आपल्या आयुष्यात सतत वाढत राहणारी गोष्ट म्हणजे वय आहे. एक वेळ आपली कंपनी आपल्याला बोनस देणार नाही, पगारात वाढ होणार नाही पण वयात वाढ झाली नाही असे होतच नाही !

थोडक्यात काय तुमचे वय वाढत जाते तसे तुमचे इन्शुरन्स चे गणितही बदलत जाते.

माणसाचे वय वाढले की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी तयार होतात, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात, त्याची काम करायची क्षमता सुद्धा कमी होते.

थोडक्यात जोखीम वाढू लागते. म्हणूनच वय वाढले की प्रीमियम सुद्धा वाढतो.

म्हणून तुमचे वय कमी असताना जेवढ्या रकमेची पॉलिसी तुम्हाला कंपनी द्यायला तयार असेल तेवढी काढून ठेवा. 

तुमची गरज नेमकी काय आहे 

तुम्हाला दर महिन्याला ठराविक पैसे बचत म्हणून बाजूला ठेवून इन्शुरन्स हवा असेल तर मनी बॅक किंवा एन्डोवमेंट अशा प्रकारच्या पॉलिसी घ्यायला हरकत नाही. या प्रकारच्या पॉलिसीमध्ये तुमच्या बचत करण्याच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला इन्शुरन्स दिला जातो. सुरुवातीला कमी पैसे साठत असतील तर छोटा का होईना विण्याचा प्लान नक्की घ्या.

हाऊसिंग लोन आहे का ?

जर तुमच्यावर गृह कर्जाचा हप्ता असेल तर फक्त आणि फक्त टर्म इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायला हवी. कारण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त विमा कवच हीच पॉलिसी देऊ शकते. 

पॉलिसी घेत असलेल्या कंपनीचा इतिहास 

तुम्हाला एखादी पॉलिसी विकत घेण्याचा सल्ला एजंटने किंवा कोणी ओळखीच्याने दिला असेल म्हणून पॉलिसी विकत घेऊ नका. तुम्ही ज्या कंपनीची पॉलिसी विकत घेणार आहात ती कंपनी किती जुनी आहे ? त्या कंपनीने आतापर्यंत किती पॉलिसी विकल्या आहेत ? त्या पॉलिसी धारकांना त्यांचे पैसे वेळेवर दिले आहेत ना ? या सगळ्याची माहिती करून घ्या. 

क्लेम सेटलमेंट तपासून पहा 

क्लेम सेटलमेंट म्हणजे विमा कंपनीने ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा पॉलिसी धारकांना त्यांचे पैसे वेळेवर दिले आहेत किंवा नाहीत याची आकडेवारी. जर एखाद्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो ९९ % असेल याचा अर्थ त्या कंपनीने आलेल्या जवळपास सगळ्या दाव्यांना वेळेवर प्रतिसाद देऊन लोकांचे पैसे वेळेवर परत केले आहेत. म्हणजेच जर क्लेम सेटलमेंट रेशो जास्त असेल तर कंपनी भरवशाची आहे असे म्हणता येईल. 

प्रीमियम दर 

बाजारात विमा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत व सर्वच कंपन्या सर्व प्रकारचा विमा देतात. अशा वेळी तुम्ही तुमचं वय आणि तुम्हाला किती रुपयाचा विमा हवा आहे या अनुषंगाने विविध विमा कंपन्यांचे प्रीमियम चार्ट तपासून पाहिले पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला योग्य दरात कोणता प्रीमियम परवडणार आहे याचा निर्णय घेऊन पॉलिसी विकत घेता येईल. 

फीडबॅक महत्त्वाचा 

तुम्ही जी विमा पॉलिसी विकत घेणार आहात ती पॉलिसी याआधी तुमचे मित्र-मैत्रिणी, ऑफिसमधले सहकारी यांनी विकत घेतली आहे का ? याचा अंदाज घ्या.  इंटरनेटवर जवळपास प्रत्येक विमा कंपनीच्या वेबसाईटवर फीडबॅक दिलेले असतात. ते फीडबॅक तपासूनच पॉलिसी विकत घ्यायची किंवा नाही याचा निर्णय घ्या.